दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा मुंबई प्रदेश च्या वतीने चैत्यभूमी दादर येथे श्रामनेर शिबिर आयोजित केले आहे. दिनांक १० एप्रिल २०२३ रोजी आयुष्यमान राजेश पवार राष्ट्रीय सचिव यांनी सिगल सत्ता हा विषय पुढील प्रमाणे सांगितला.
सिगाल सुत्त
सिगाल सुत्त गृहस्थांची आचारसंहिता कथन करणारे अत्यंत महत्वाचे सुत्त आहे. या सुत्तात बुद्धाने सिगाल या गृहस्थाला सहा दिशांची पूजा करण्याऐवजी, आईवडिल, शिक्षक, पत्नी व मुले, मित्र आणि सहकारी, मजूर आणि चाकर आणि धम्मशिक्षक यांचा आदर व सन्मान करण्याची सूचना केली.
हे सुत्त म्हणूनच, प्रत्येक व्यक्तीने आईवडिल, पत्नी व मुले, मित्र आणि सहकारी, चाकर व मजूर आणि धम्मशिक्षक यांचेशी वर्तन करण्याची योग्य पद्धत कोणती. हे शिकविते.
"एकदा भगवान राजगृह येथील वेळूवनातील कलंदनिवासात विहार करीत होते.
त्या समयी एका गृहस्थाचा सिगाल नावाचा तरूण पुत्र प्रातःकाळी उठून राजगृहाच्या बाहेर गेला आणि ओल्या केसांनी आणि कपड्यांनी वर हात जोडून पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर वर, खाली अशा रीतीने सर्व दिशांची पूजा करू लागला.
त्याच वेळी सकाळी भगवंतांनी चीवर परिधान करून, चीवर व भिक्षापात्र घेऊन राजगृहात भिक्षेसाठी प्रवेश केला. सहा दिशांची पूजा करणारा सिगाल त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांनी विचारले, 'तू दिशांची पूजा का करीत आहेस?"
त्यावर सिगालाने उत्तर दिले, 'माझे वडिल मृत्यूशय्येवर असताना मला म्हणाले की, 'मुला, तू आकाश-पृथ्वीच्या सर्व दिशांची पूजा करीत जा. 'वडिलांच्या आशेचा मान राखण्यासाठी, भगवान, भी अशा रीतीने पूजा करीत आहे. '
भगवान बुद्धांनी त्यास विचारले की तुला सहा दिशांची पूजा करणे याचा अर्थ माहित आहे का? सहा दिशांची पूजा कोण करू शकतो हे तुला माहित आहे काय?
सिगालाने उत्तर दिले, 'सहा दिशांची पूजा कोण करू शकतो आणि कशी करावी याविषयी कृपया मला सांगावे.
'तरूण गृहस्था, ऐक: मी तुला सहा दिशांची पूजा कशी करावी आणि सहा दिशांची पूजा करण्यास कोण लायक असतो याविषयी सांगतो. ' तरुण सिगाल म्हणाला, 'ठीक आहे.' मग भगवंत म्हणाले:
चार प्रकारचे कर्म कलेश चार प्रकारचे पाप कृत्य आणि सहा प्रकारची संपत्ती नाशाची कारणे यापासून अलिप्त असणारी व्यक्ती तीच सहा दिशांची पूजा करण्यास लायक असते.
चार प्रकारचे कर्म क्लेश
'माणसाच्या धर्माने माणसाला दुर्वर्तनापासून परावृत्त होण्यास शिकविले पाहिजे.
(१)जीवहत्या करणे,
(२) न दिलेले बलात्काराने घेणे,
(३) व्यभिचारी करणे आणि
(४)असत्य बोलणे,
हे चार दुर्गुण त्याने टाळले पाहिजेत. '
चार प्रकारचे पापकर्म घडून येण्याचे चार हेतु
'सिगाल हे लक्षात ठेव की, पापकर्म ही
(१)पक्षपातीपणा,
(२)शत्रुत्व,
(३)मूर्खपणा आणि
(४)भय
यामुळे घडतात, यापैकी कोणताही हेतू त्याच्या कृत्याच्या मागे नसेल तर त्याच्या हातून पापकर्म घडणार नाही.'
संपत्तीच्या उधळपट्टीचे सहा मार्ग
'माणसाच्या धर्माने माणसाला आपल्या संपत्तीची उधळपट्टी करू नये असे शिकविले पाहिजे.
(१)मद्यपानाचे व्यसन,
(२)अवेळी रस्त्यावरून भटकत राहणे.
( ३)जत्रांतून परिभ्रमण करणे,
(४)जुगाराची सवय जडणे,
(५)कुमित्रांची संगत धरणे आणि
(६)आळशी सवयी अंगी लावून घेणे,
यांमुळे संपत्तीची धूळधाण होते.'
मद्यपानाच्या सवयीमुळे उद्भवणारी सहा संकटे
‘मद्यपानाच्या सवयीने सहा प्रकारची संकटे उद्भवतात. (१)संपत्तीचा खराखुरा नाश
, (२)वाढती भांडणे.
(३)रोगाधीनता,
(४)शीलभ्रष्टता,
(५)अश्लील वर्तणूक आणि
(६)बुद्धीनाश
ही सहा संकटे होत. '
अवेळी रस्त्यांवरून भटकण्यामुळे उद्भवणारी सहा संकटे
'अवेळी रस्त्यावर भटकण्याने माणूस सहा प्रकारच्या संकटात पडतो. ती म्हणजे
(१)तो स्वतः,
२) त्याची बायकामुले आणि
३)त्याची मालमत्ता ही अरक्षित राहतात.
४) त्याप्रमाणेच ज्या गुन्ह्यांचा तपास लागला नाही, त्यासंबंधी त्याचा संशय घेतला जातो.
५) खोट्या अफवा त्याला चिकटतात आणि
६) त्यांना तोंड देण्यास त्याला पुष्कळ त्रास सोसावा लागतो. '
जत्रेत भटकण्यामुळे उद्भवणारी सहा संकटे
. 'जत्रेत भटकल्याने तो सहा प्रकारच्या संकटात सापडतो. ती म्हणजे तो सारखा विचार करीत राहतो की
,१) नाचणे, २)गाणे,३) बजावणे,४) काव्य गायन, ५)झांजा,६) ढोलकी कुठे वाजत आहेत का?
जुगारावर मोहीत होण्यामुळे उद्भवणारी सहा संकटे
‘जुगाराने मोहीत होणा-यांवर येणारी सहा संकटे म्हणजे, १)खेळात जिंकला तर त्याचे सहकारी त्याचा द्वेष करतात
२) हरला तर द्रव्यनाशाबद्दल तो स्वतः शोक करतो.
३) त्याच्याजवळची नगदी संपत्ती व्यर्थ जाते,
४) न्यायालयासमोर त्याच्या शब्दाला किंमत उरत नाही,
५) त्याचे मित्र आणि सहकारी त्याचा तिरस्कार करतात.
६) लग्नासाठी त्याला कोणीच मागणी घालीत नाही. कारण लोक म्हणतात, जुगा-याला बायकोचे पालनपोषण कसे करता येणार?”
कुसंगतीमुळे ओढवणारी सहा संकटे
'कुसंगतीने सहा प्रकारची संकटे ओढवतात. ती म्हणजे त्याला कोणाही
१)जुगारी, २) व्यभिचारी, ३) दारूबाज, ४ ) लबाड, ५) पैसे खाऊ आणि ६) हिंसक मनुष्याची मैत्री जडते. '
आळशीपणाच्या सवयीमुळे ओढवणारी सहा संकटे
. 'आळशीपणाच्या सवयीने ओढवणारी सहा संकटे म्हणजे,
१) तो म्हणतो, आता फार थंडी आहे म्हणून मी काम करीत नाही.
२) आता फार गरमी आहे म्हणून काम करीत नाही,
३) अद्यापि अवकाश आहे किंवा
४) आता फार उशीर झाला, म्हणून मी काम करीत नाही; तो म्हणतो,
५) फार भूक लागली आहे म्हणून काम करीत नाही.
६) तो म्हणतो, हातात फारच काम आहे म्हणून काम करीत नाही.
आणि अशा रीतीने जे करायला पाहिजे ते त्याच्या हातून घडत नाही. त्याच्या संपत्तीत भर पडत नाही आणि असलेली संपत्ती हळूहळू नाहीशी होऊ लागते. '
चार प्रकारचे कर्मकेश चार प्रकारचे पाप कृत्य आणि सहा प्रकारच्या संपत्ती नाशाची कारणे यापासून तुम्ही अलिप्त असाल तर तुम्हाला खऱ्या मित्राची पारख करता येते.
ख-या मित्राची पारख
'व्यवहारी माणसाच्या धर्माने ख-या मित्राची पारख करण्यास त्याला शिकविले पाहिजे.'
'मित्र म्हणून म्हणविणारे परंतु वस्तूतः शत्रू असणारे असे चार प्रकारचे लोक आहेत.
१)लोभी पुरूष,
२)बोलघेवडा परंतु कृतीने शून्य असा पुरुष,
३)खुशामत्या पुरूष आणि
४) उधळ्यावृत्तीचा पुरुष,
मित्रासारखे वाटणारे चार प्रकारचे शत्रू
'यापैकी पहिल्या प्रकारचा मनुष्य बाहेरून मित्रत्व दाखवितो, परंतु आतून तो शत्रुसारखा वागतो. कारण तो देतो थोडे व मागतो अधिक. केवळ भीतीने तो आपले कर्तव्य करीत असतो. परंतु त्याचा मूळ हेतू स्वार्थ साधणे हा असतो. '
जो बोलघेवडा आहे आणि कृतीच्या नावाने शून्य आहे, असा मनुष्य कितीही मैत्री दाखवित असला तरी तो शत्रूच मानावा. कारण तो आपल्या गत किंवा भावी काळासंबंधी मोठ्या आत्मीयतेने बोलत असला तरी त्याचा हेतू पोकळ शब्दांनी तुमची कृपा संपादन करायची हा असतो. प्रसंग पडताच मात्र तो आपल्या अंगी साहाय्य करण्याचे सामर्थ्य नाही असे सांगून दगा देतो.'
खुशामती मनुष्य मित्रासारखा वाटत असला तरी तो शत्रूच समजावा. तो दुष्कृत्ये करण्याला संमती देतो आणि सत्कृती त्याला असंमत असते. तो तुमच्या तोंडावर तुमची स्तुती करतो, परंतु तुमच्या पाठीमागे दुसऱ्याजवळ तुमची निंदा करतो. '
'त्याचप्रमाणे उधळ्यासोबती मित्रासारखा वाटत असला तरी शत्रूच मानावा. कारण तुम्ही अवेळी रत्यावर भटकत असताना तो तुम्हाला सोबत करतो. नाच तमाशा पाहताना तो तुम्हाला सोबत करतो. तुम्ही द्यूतक्रीडेत मग्न झाला असता तुम्हाला तो सोबत करतो.'
मनःपूर्वक मैत्री करणारे चार मित्र
'मनःपूर्वक मैत्री करणारे चार मित्र असतात. १) सहाय्यक,२) सुख-दुःखामध्ये समान मैत्री ठेवणारा, ३) सद्वर्तनाचा सल्ला देणारा आणि ४) सहानुभूती दाखविणारा. '
'सहाय्यक हा खरा मित्र समजावा. कारण तुम्ही बेसावध असताना तो तुम्हाला सावध करतो. तुमचे आपल्या मालमत्तेवर लक्ष नसताना तो तिथे संरक्षण करतो, तुम्ही भयग्रस्त झाले असता तो तुम्हाला आश्रय देतो, तुम्हाला एखादे काम करावयाचे असले की, ते तुम्हाला दुपटीने पुरवितो. ' तुम्हाला ज्याची गरज असेल
'सुख दु:खा मध्ये समान मैत्री ठेवणारा खरा मित्र मानावा. कारण तो आपली गुपिते तुम्हाला सांगतो. तुमची गुपिते तो गुप्त ठेवतो. तुमच्या अडचणीत तुमचा त्याग करीत नाही प्रसंग पडला तर तुमच्यासाठी प्राणदान करायला तयार असतो.
'तुम्ही काय केले पाहिजे याचा सल्ला देणारा खरा मित्र मानावा कारण तो तुम्हाला दुष्कृत्यापासून परावृत्त करतो, सत्कृत्याला प्रवृत्त करतो. जे पूर्वी कधी ऐकले नाही, अशा चार गोष्टी तुम्हाला सांगतो आणि सन्मार्ग दाखवितो. '
'तुमच्याबद्दल सहानुभूती दाखविणारा खरा मित्र मानावा. कारण तो तुमच्या दुःखाने दुःखी होतो. सुखाने आनंदित होतो. तुमची निंदा करणा-यांना तो प्रतिबंध करतो आणि तुमची स्तुती करणा-यांची तो प्रशंसा करतो,' असे भगवंत म्हणाले.
‘जो धम्म मानवधम्म आहे, तो मानवाला षड्दिशांची पूजा करण्याऐवजी आपले आईबाप, शिक्षक, पत्नी, मुले, मित्र, सोबती, नोकरचाकर आणि धम्मगुरू यांचा मान राखायला शिकवितो. '
पुत्रांसाठी विनय
मुलांनी वडिलांची सेवा करावी. त्यांनी असा विचार मनात आणावा की. माझ्या वडिलांनी माझे पालनपोषण केले आणि मी त्यांना पोसले पाहिजे. त्यांना जी कर्तव्ये करावी लागली ती आता मी केली पाहिजेत. माझ्या कुळाची परंपरा मी चालविली पाहिजे आणि त्या परंपरेला जुळेल अशी योग्यता मी माझ्या अंगी आणली पाहिजे. वडिल मुलावर प्रेम करीत असतात, दुर्गुणापासून त्याला परावृत्त करतात. सद्गुणाचा त्याला उपदेश करतात. आपल्या व्यवसायाचे त्याला शिक्षण देतात. त्याला साजेल असे त्याचे लग्न करून देतात आणि योग्य वेळी आपली सारी मालमत्ता त्याच्यावर सोपवतात."म्हणजेच तुम्ही पूर्व दिशेची पूजा केली असे समजावे.
शिष्यांसाठी विनय
शिष्याने पुढीलप्रमाणे आपल्या गुरूची सेवा करावी. ते आले असता आसनावरून उठून त्यांना मान द्यावा. त्यांना अभिवादन करावे. त्यांची सेवा करावी. ते शिकवतील ते उत्सुकतेने शिकावे. त्यांचे कोणते काम करावयास पडले तरी ते करावे आणि ते अध्यापन करीत असता एकाग्र चित्ताने ते ग्रहण करावे. कारण गुरू शिष्यावर प्रेम करतात. जे त्यांना ज्ञान आहे ते त्या शिष्याला देतात. जे एकदा शिष्याने ग्रहण केले आहे ते त्याचे ज्ञान गुरू अध्यापनाने दृढ करतात. ते सर्व विद्या आणि कला त्याला पूर्णपणे शिकवितात. त्याचे मित्र आणि सोबत्याशी त्याच्यासंबंधी चांगले बोलतात आणि ते सर्व त-हेने त्याच्या रक्षणाची काळजी वाहतात.” म्हणजेच तुम्ही दक्षिण दिशेची पूजा केली असा अर्थ होतो.
पती-पत्नीसाठी विनय
“पतीने आपल्या पत्नीचा सन्मान राखून, आदरभाव प्रदर्शित करून, तिजशी एकनिष्टतेने वागून, तिला सत्ता देऊन, तिला लागणारे दागदागिने पुरवून, तिची सेवा करावी. कारण पत्नी त्याच्यावर प्रेम करते, ती सासर- माहेरच्या नातलगांचे आदरातिथ्य करून आपले कर्तव्य बजाविते, ती पतिव्रत्याने वागते, आपल्या नव-याच्या उपार्जित धनावर दक्षतापूर्वक लक्ष ठेवते, आणि उद्योगाने आणि कुशलतेने आपली कर्तव्ये पाळते.” म्हणजेच तुम्ही पश्चिम दिशेची पूजा केली असा अर्थ होतो.
“कुलपुत्राने औदार्याने, दाक्षिण्याने, दानधर्माने आपल्या मित्रांची आणि सहका-यांची सेवा करावी.आपल्यासारखेच त्यांना वागवावे, आणि आपण स्वतः त्यांना दिल्या शब्दाप्रमाणे वागावे. कारण त्याचे मित्र आणि परिचित त्यांच्यावर प्रेम करतात. तो गैरसावध असताना त्याचे व त्याच्या मालमत्तेचे रक्षण करतात. संकटात ते त्याला आधार देतात. त्याच्या आपद्भवस्थेत त्याग करीत नाहीत, आणि परिवाराच्या हिताला जपतात."म्हणजेच तुम्ही उत्तर दिशेची पूजा केली असा अर्थ होतो.
धनी व सेवक यांसाठी विनय“
धन्याने नोकर-चाकरांना पुढीलप्रमाणे वागवावे. त्याने त्यांच्या सामर्थ्यांप्रमाणे त्यांना काम द्यावे अत्र व मजुरी द्यावी. ते आजारी पडले असतांना त्यांची शुश्रूषा करावी, असाधारण स्वादिष्ट पक्वान्नं त्यांनी वाटून खावी. वेळ पडेल तेव्हा त्यांना रजा द्यावी. कारण नोकर-चाकर हे धन्यावर प्रेम करतात. ते त्याच्यापूर्वी उठतात, आणि त्याच्यानंतर झोपतात. त्यांना जे द्यावे त्यात ते समाधान मानतात. ते आपले काम चोख बजावतात आणि धन्याची किर्ती सर्वत्र वाढवितात. "म्हणजेच तुम्ही खालच्या दिशेची पूजा केली असा अर्थ होतो.
“कुलपुत्राने आपल्या धम्मगुरूची सेवा काया-वाचा-मनसा, त्याजवर प्रीती करून, आपल्या घराचे दार त्यांना सदैव मोकळे ठेवून व त्यांच्या ऐहिक गरजा भागवून करावी, कारण धम्मगुरू आपल्या शिष्याला दुष्कृत्यापासून पराड़ मुख करतात, त्याला सन्मार्गाचा उपदेश करतात. मायेने त्यांच्यासंबंधी विचार करतात. जे पूर्वी कधी कानी पडले नाही ते शिकवितात आणि पूर्वी जे कानी पडलेले असते ते चूक असेल तर त्याची सुधारणा करतात. म्हणजेच तुम्ही वरच्या दिशेची पूजा केली असा अर्थ होतो.
. भगवंतांनी सिगालाला वरीलप्रमाणे उपदेश केल्यावर तो म्हणाला, “सुंदर! फार सुंदर! एकदा स्थानभ्रष्ट झालेली वस्तू ज्याप्रमाणे परत स्थानावर बसवावी, किंवा जे गुपीत होते ते उघड करावे किंवा पथभ्रष्टाला सन्मार्ग दाखवावा किंवा काळोखात दीप लावावा आणि डोळे असतील त्यांना सन्मार्ग दाखवावा, अगदी त्याप्रमाणे भगवंतांनी मला अनेक रीतीने सत्य विशद करून सांगितलेले आहे.
“मी भगवंतांना, त्यांनी सांगितलेल्या धम्माला आणि संघाला शरण जातो.आजपासून आमरण शरण आलेल्या या उपासकाचा स्वीकार करावा. तथागताच्या प्रवचनाअंती सिगाल अत्यंत आनंदी झाला आणि तो बुद्ध, धम्म, आणि संघाला शरण गेला. त्याने तथागताला आपला शिष्य करून घेण्याची विनंती केली.
No comments:
Post a Comment