मोखावणे, दि. ७ फेब्रुवारी २०२५ – जिल्हा परिषद शाळा मोखावणेची शैक्षणिक सहल मोठ्या उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांना ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाची माहिती देण्याच्या उद्देशाने या सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
सहलीची सुरुवात धम्मगिरी (इगतपुरी) येथून झाली. तेथील सुंदर गार्डन पाहून विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. तथागत भगवान बुद्धाच्या जीवनावर आधारित चित्रप्रदर्शन आणि आनापान ध्यान पद्धतीवरील माहितीपट विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
यानंतर त्रिरश्मी बौद्ध लेणी (नाशिक) येथे भेट देण्यात आली. ऐतिहासिक बौद्ध लेणींमध्ये विद्यार्थ्यांनी प्राचीन स्थापत्यशैलीचा अभ्यास केला. लेणीच्या खाली असलेल्या बुद्ध विहारात जाऊन त्यांनी शांततेचा अनुभव घेतला.
यानंतर पेरूची वाडी या ठिकाणी सहलीचा पुढील टप्पा पार पडला. येथे सर्वांनी प्रसिद्ध मिसळपाव चाखला. विद्यार्थ्यांनी विविध पक्षी व प्राण्यांची निरीक्षणे केली, त्यांना हाताळण्याचा आनंद घेतला. पक्ष्यांसोबत खेळण्याचा अनोखा अनुभवही घेतला. त्यानंतर विविध खेळ, होडीची सफर आणि डीजेवर नृत्य करत विद्यार्थ्यांनी भरभरून आनंद लुटला.
परतीच्या प्रवासात काळाराम मंदिर आणि सीता गुंफा येथे भेट देण्यात आली. ऐतिहासिक व धार्मिक वारसा पाहून विद्यार्थी भारावून गेले. रात्री साडेनऊ वाजता शाळेत परत आल्यावर सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.
ही शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांसाठी माहितीपूर्ण आणि आनंददायक ठरली. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून हा दिवस संस्मरणीय बनवला.
No comments:
Post a Comment