दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्या वतीने चैत्यभूमी दादर येथे केंद्रीय शिक्षक प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. या शिबिरात दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी आयुष्यमान राजेश पवार राष्ट्रीय सचिव यांनी दस पारमिता हा विषय पुढील प्रमाणे शिकविला.
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात बुद्धाच्या पहिल्या प्रवचनाविषयी विवेचन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दहा पारमिता समजावून सांगितल्या आहेत. पारमिताना डॉ. आंबेडकरांनी शीलमार्ग किंवा सदाचाराचा मार्ग असे संबोधिले आहे. शीलमार्ग म्हणजे पुढील गुणाचे पालन करणे होय: (१) शील, (२) दान, (३) उपेक्षा, (४) नैष्क्रम्य, (५) वीर्य, (६) शांति, (७) सत्य, (८) अधिष्ठान, (९) करूणा आणि (१०) मैत्री.
पारमितांचे महत्व
बोधिसत्त्वाच्या जीवनात पारमिताना अनन्यसाधारण असे महत्व आहे. बोधिसत्त्व प्राप्त करीत असलेल्या दहा सामर्थ्यासह त्याला दहा पारमिता सुद्धा पूर्ण करणे आवश्यक असते. त्यानंतरच तो बुद्ध होण्यास पात्र ठरतो
“बोधिसत्त्वाची स्थित्यंतरे होत असताना त्याने ही दहा सामर्थ्य मिळविली पाहिजेत, इतकेच नव्हे तर त्याने "दहा पारमिता " चाही परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे.
एक 'पारमिता' ही जीवनाच्या एका अवस्थेची परिपूर्ती असली पाहिजे. पारमिताचा खास व्यासंग पायरीपायरीने केला पाहिजे एका जीवनात एकच पारमिता असली पाहिजे. एकीचा थोडा अंश आणि दुसरीचा थोडा अंश असे मिश्रण त्यात असता कामा नये.
अशाप्रकारे बोधिसत्त्वाची दुहेरी तयारी झाल्यानंतरच तो 'बुद्ध' होतो.'बुद्ध' बोधिसत्त्वाच्या जीवनातील कळस होय. अशप्रकारे दहा पारमिता पूर्ण केल्याशिवाय बोधिसत्व हा बुद्ध होऊ शकत नाही.
गृहस्थ उपासकांसाठी सुद्धा या दहा पारमिता अत्यंत महत्वाच्या आहेत. दहा पारमिताच्या अभ्यासामुळे गृहस्थ उपासकांना आर्य अष्टांगिक मार्गाचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी मदत होते व ते सदाचारी जीवन जगण्यास समर्थ होतात.
पारमिता
१. शील
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शीलाची व्याख्या करताना बुद्धाचे पुढील विवचेन उद्धृत केले आहे.
"शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे आणि चांगल्या गोष्टी करण्याकडे असलेला मनाचा कल अपराध करण्याची लाज वाटणे, शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्ट करण्याचे टाळणे म्हणजे शील. शील म्हणजे पापभीरूता .
बुद्धाने व्यक्तीच्या प्रकारावरून शील सांगितले आहेत.
. गृहस्थ आणि गृहीणीसाठी पंचशील पालन करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादीत केली आहे. तथापि उपोसथाचे दिवशी गृहस्थ आणि गृहीणींकरिता बुद्धाने अष्टशीलाचे पालन करण्याची आवश्यकता प्रतिपादीत केली आहे.
श्रामणेर आणि श्रमणेरी यांच्यासाठी दहा शील आणि भिक्खू आणि भिक्खुणी यांचेसाठी अनुक्रमे २२७ आणि २३५ विनयनियम बुद्धाने घालून दिलेले आहेत.
२. दान
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दान या पारमितेची पुढील शब्दात व्याख्या केलेली आहे.
“स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुस-याच्या भल्यासाठी स्वतः ची मालमत्ता, रक्त आणि देह अर्पण करणे, इतकेच नव्हे तर प्राणत्याग करणे म्हणजेच दान होय.
२४ जानेवारी, १९५४ रोजी मुंबई येथे झालेल्या संमेलनात दान पारमितेविषयी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले “गौतम बुद्धानी वरीलप्रमाणे "दान पारमिता " जरी शिकविली असली तरी दान हे सत्पात्री असण्याबद्दल त्यांचा कटाक्ष होताच. दान देण्यासाठी दाता जरी प्रवृत्त झाला तरी त्यामुळे ज्याला दान दिले जाते त्याला मात्र त्याने कमीपणा येता कामा नये. पददलितांना एक दिवस स्वतः च्या पायावर उभे राहाण्यास सामर्थ्य निर्माण करणारी शक्ति, जिला आपण मदत म्हणतो तेच खरे दान. "
डॉ. आंबेडकरांनी त्यानंतर उपस्थित समुहाला त्यांच्या आचरणासंबंधी पुढील सूचना दिल्या..
"साधुसंतांच्या नावावर पैसा जमा केला असेल तर त्याचा पारमितामध्ये सांगितलेल्या तत्त्वाप्रमाणे विनियोग करणे अत्यंत आवश्यक आहे. दारिद्रय, अज्ञान, रोगराई इतकी आहे की, सध्याच्या काळात ती नष्ट करण्यासाठी असा पैसा खर्च न करता तो धनिकांसाठी खर्च करणे म्हणजे दुष्टपणा ठरेल. त्या पैशाचा विनियोग रुग्णालये, शिक्षण, बेकारांसाठी छोटे छोटे धंदे, गरीब व अनाथ महिलांसाठी काही तरी धंदेशिक्षण देणे अशा कार्यावर त्यांनी करावा. आपण जमा केलेल्या पैशाचा विनियोग अशारितीने केला तर त्यामुळे आपल्या कार्याची वाहवा होईल.
३ उपेक्षा
उपेक्षेची व्याख्या पुढीलप्रमाणे आहे.
"उपेक्षा म्हणजे औदासीन्याहून निराळी अशी अलिप्तता, अनासक्ती, आवड किंवा नावड नसलेली ती एक मनाची स्थिती होय फलप्राप्तीने विचलित न होणे; परंतु निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे म्हणजेच उपेक्षा.
आपल्या दैनदिन जीवनात आपण काया, वाचा आणि मनाने केलेल्या कृतीचा नेमका असा परिणाम घडून येतो अनेकदा हा परिणाम दुःखदायक असतो. काही परिणामांमुळे आनंद प्राप्त होतो आणि काही परिणामांमुळे व्यक्ती दुःखी होते. तथापि, उपेक्षेचा भाव ज्याच्या मनात निर्माण झालेला आहे अशी व्यक्ती अशा परिणामाने प्रभावित होत नाही. परिणाम काहीही असला तरी सुखी किंवा दुःखी होत नाही.
उपेक्षा म्हणजे समतोलपणा राखणे आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये अनित्यबोध जागवून कृती करणे. याचाच अर्थ सर्व प्रकारच्या संवेदनामध्ये विद्यमानअसलेला अनित्य स्वभाव जाणणे होय.
४. नैष्क्रम्य
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानी नैष्क्रम्य या पारमितेची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे. २. "नष्क्रम्य म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग.
नैष्क्रम्य पारमितेच्या अभ्यासात पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी गृहस्थ जीवनाचा त्याग करण्याची आवश्यकता असते. परिव्राजक नैष्क्रम्य पारमिता उत्तम त-हेने पूर्ण करू शकतात, कारण ते कौटुंबिक जबाबदारीतून मुक्त असतात. सिद्धार्थ गौतमाच्या परिव्रजेला महाभिनिष्क्रमण असे म्हणतात. याचाच अर्थ नैष्क्रम्य या पारमितेत बुद्धा एवढे पूर्णत्य कोणीही प्राप्त केले नाही.
५. वीर्य
वीर्य या पारमितेची व्याख्या पुढीलप्रमाणे आहे:
"वीर्य म्हणजे योग्य (सम्यक) प्रयत्न. हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे म्हणजे वीर्य
वीर्य ही पारमिता अष्टांगिक मार्गातील सम्भावायामो या अंगाशी साम्य दर्शविते अष्टांगिक मार्गाचे पालन करण्यासाठी लाभदायक अशा चित्तवृत्ती निर्माण करणे हे या पारमितेचे उद्दिष्ट आहे.
६. शांती
शांति या पारमितेची व्याख्या पुढीलप्रमाणे आहे:
"शांति म्हणजे क्षमाशीलता. द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे हे याचे सार होय. कारण द्वेषाने द्वेष शमत नाही. तो फक्त क्षमाशीलतेनेच शांत होऊ शकतो.. या पारमितेत पूर्णत्व साधण्यासाठी लोकांनी अकुशल कम्म केले तरी त्यांना क्षमा करून त्यांच्या कल्याणाचा विचार आपण केला पाहिजे.
७. सत्य
सत्य या पारमितेविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिहितात:
"सत्य म्हणजे खरे. माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये. त्याचे भाषण हे सत्यच असले पाहिजे. ते सत्याखेरीज दुसरे काहीही असता कामा नये . सत्य ही पारमिता अष्टांगिक मार्गातील सम्यक वाचा या अंगाशी साम्य दर्शविते.
८. अधिष्ठान
अधिष्ठान या पारमितेची व्याख्या पुढीलप्रमाणे केलेली आहे:
“अधिष्ठान म्हणजे ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय . कोणतेही कार्य सिद्धीस नेण्याचा दृढनिश्चय करणे आणि हे कार्य पूर्ण केल्याशिवाय त्या दिशेने सुरू असलेले प्रयत्न न थांबविणे यालाच अधिष्ठान असे म्हणतात.
बुद्धत्व प्राप्तीपूर्वी सिद्धार्थ गौतमाने दृढनिश्चय केला होता की, जरी त्याचे रक्त, स्नायू, कातडी आणि हाडे सुकून गेली, तरी पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय ते ध्यान करीत असलेली जागा सोडणार नाहीत. हे सिद्धार्थ गौतमाचे अधिष्ठान होते.
९. करूणा
करूणा या पारमितेची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे.
“करूणा म्हणजे सर्व मानवाविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता " डॉ. आंबेडकराच्या मतानुसार प्रज्ञेबरोबरच करूणा हा बुद्ध धम्माचा दोनपैकी एक पाया आहे हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी बुद्धाने आजारी भिक्खूचे शरीर स्वच्छ केल्याच्या प्रसंगांचा दाखला दिला.
“पूर्वी गांधार नावाच्या देशात एका भयानक रोगाने पछाडलेला एक वृद्ध भिक्खू होता तो ज्या ज्या ठिकाणी उठत अथवा बसत असे ती जागा मलिन होई.
तो गांधार देशातील एका विहारात राहात असे कोणीही त्याच्याजवळ जात नसे किंवा त्याला संकटात साहाय्य करीत नसे.
एकदा भगवान बुद्ध आपल्या अनुयायांसह तेथे गेले आणि आवश्यक पाने, भांडी, गरम पाणी घेऊन, तो म्हातारा भिक्खु जेथे पडलेला होता त्या ठिकाणी सर्व भिक्खूसह येऊन पोहोचले. त्या जागेला एवढी दुर्गंधी येत होती की, त्या सर्व भिक्खूंना त्या माणसासबंधी घृणा वाटू लागली. परंतु तथागताने शक्रदेवाला गरम पाणी ओतायला सांगून आपल्या स्वत: च्या हाताने त्या भिक्खूचे शरीर धुण्यास आणि त्याच्या रोगावर उपचार करण्यास प्रारंभ केला.हे समजताच राजा, त्याचे प्रधान, देव आणि नाग लोक तेथे धावत आले आणि भगवान बुद्धाची पूजा करू लागले..
तथागताला उद्देशून त्यांनी विचारले, “इतक्या थोर, उदात्त, महापुरूषाने असे घाणेरडे काम का करावे?" यावर भगवान बुद्धाने आपल्या कृतीचे असे स्पष्टीकरण केले.
“या जगात जे गरीब आहेत, असहाय्य आणि अनाथ आहेत त्यांचा तथागत मित्र आहे. शारीरिक व्याधीनी पछाडलेले आहेत. मग ते श्रमण असोत अथवा इतर कोणीही असोत त्यांची सेवा करण्यासाठी, जे दरिद्री, अरक्षित आणि वृद्ध आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी आणि इतरांना आपल्यासारखेच करायला प्रेरणा देण्यासाठी तथागताचा जन्म आहे. "
१०. मैत्री
मैत्री या पारमितची पुढीलप्रमाणे व्याख्या केलेली आहे.
"मैत्री म्हणजे सर्व प्राण्यांविषयी मित्राविषयीच नव्हे तर शत्रूविषयीदेखील,मनुष्यप्राण्याविषयीच नव्हे तर सर्व जीवमात्राविषयी बंधुभाव बाळगणे.बुद्ध हे श्रावस्ती येथे राहत असताना एका सुत्तात मैत्री ही सकल्पना त्यानी स्पष्टपणे समजावून सांगितली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात जेव्हा धम्म करूणेपेक्षाही मैत्रीचे महत्व अधिक प्रतिपादतो तेव्हा सद्धम्मरूप पावतो या भागात याविषयी विस्तृत विवेचन केले आहे.
“मैत्री संबंधी बोलतांना भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणाला, "समजा मनुष्य एक विहीर खणतो आहे. भूमी त्यामुळे रागावते काय?"“नाही भगवान, नाही!” ते भिक्खू उत्तरले.“समजा, एक मनुष्य लाख आणि रंग घेऊन हवेत चित्रे रंगवू लागला. तो चित्र रंगवू शकेल असे तुम्हाला वाटते काय?" “नाही, भगवान!” “का नाही?" भिक्खू म्हणाले, “कारण हवेत असे काळे फलक नाहीत की. ज्यावर रंग भरता येईल. ' "
“त्याप्रमाणेच तुमच्या मनातही काळे किल्मिष असता कामा नये. कारण किल्मिष ही दुर्विचाराचीच प्रतिबिंबे असतात.
“समजा, एखादा मनुष्य हातात पेटती मशाल घेऊन गंगेला आग लावण्यासाठी निघाला, तर त्याला आग लावता येईल काय?""
नाही नाही भगवान
“का नाही?” “कारण गंगेच्या पाण्यात ज्वालाग्राहीपणा नाही. "
आपले प्रवचन संपवीत भगवत म्हणाले, “ज्याप्रमाणे भूमीला इजा झाल्यासारखे वाटत नाही आणि ती रागावत नाही, ज्याप्रमाणे हवा आपल्यावर कसलीच प्रतिक्रिया होऊ देत नाही आणि ज्याप्रमाणे अग्नीने विचलित न होता गंगाजळ सारखे वाहात राहते, त्याप्रमाणे भिक्खूनो, तुम्ही दुस-याने केलेला अपमान आणि अन्याय सहन करून त्यांच्याशी मैत्रीनेच वागत राहिले पाहिजे."
“भिक्खुनो मैत्री ही सतत आणि अप्रतिहत वाहात राहिली पाहिजे आपले मन पृथ्वीसारखे खंबीर हवेसारखे विमल आणि गंगेसारखे गंभीर ठेवणे हे तुमचे पवित्र कर्तव्य आहे असे जर तुम्ही कराल तर कितीही दु सह गोष्ट घडली तरी तुम्ही सहसा विचलित होणार नाही कारण जे कोणी उपद्रव देतात ते शेवटी दमून जातात. ""
“तुमच्या मैत्रीचा परिसर विश्वासारखा अमर्याद असावा, तुमचे विचार भव्य आणि अपार असावेत आणि त्यात द्वेषाचा लवलेश नसावा'
“माझ्या धम्मानुसार केवळ करूणेने वागणे हे पुरेसे नाही, त्यात मैत्रीने वागणे आवश्यक आहे. "
या प्रवचनात भगवतांनी भिक्खूंना एक कथा सांगितली ती सस्मरणीय आहे.
पूर्वी एकदा श्रावस्ती नगरात विदेशिका नावाची एक कुलीन स्त्री राहात असे. ती सभ्यता, लीनता आणि सौम्यता या गुणांबद्दल प्रसिद्ध होती. तिची एक मोलकरीण होती तिचे नाव काली ती मोठी चलाख, सकाळी लवकर उठणारी आणि कामसू अशी मुलगी होती. कालीने स्वत: शी विचार केला, "माझ्या मालकिणीची ख्याती आहे की. तिला क्रोध असा येतच नाही, ती प्रकट करीत नाही, किंवा कदाचित मी आपले काम इतक्या चोखपणे बजावते म्हणून तिचा क्रोध अप्रकट राहात असावा. मी तिला कसोटी लावून पाहते "
म्हणून ती दुस-या दिवशी उशीरा उठली. तिच्या मालकिणीने तिला हाका मारून विचारले, 'तू इतक्या उशीरा का उठलीस?' मोलकरीण म्हणाली, "त्यात काय बाईसाहेब?' रागावून आणि चिडून ती मालकीण मनाशी म्हणाली, 'त्यात काही नाही काय? लबाड कुठली!'
मोलकरणीने विचार केला, 'राग हा विकार तिच्या ठिकाणी आहे तर! ती दाखवीत नाही एवढेच मी माझे काम चोख बजाविते म्हणून ती रागावत नसावी. आणखी मी तिची कसोटी घेईन!' म्हणून ती दुस-या दिवशी अधिक उशिरा उठली. मालकिणीने विचारले, 'काले, तू उशीरा का उठलीस?' मोलकरणीने उत्तर दिले, 'त्यात काय आहे?' आपला राग आणि चीड शब्दात व्यक्त करीत मालकीण म्हणाली, 'अस्सं! त्यात काही नाही काय? लबाड कुठली!'
. 'अस्सं तर', त्या मोलकरणीने विचार केला, 'राग हा विकार तिच्या ठिकाणी आहे; पण माझे काम मी नीट करते म्हणून ती ते दाखवीत नाही. मी आणखी अधिक तिची कसोटी घेईन. ' म्हणून ती दुस-या दिवशी फारच उशिरा उठली. मालकिणीने तिला हाक मारून विचारले, 'इतक्या उशीरा का उठलीश ?' मोलकरणीने उत्तर दिले, 'अं! त्यात काय आहे?"
'अस्सं तर! इतक्या उशिरा उठणे म्हणजे काहीच नाही काय? लबाड मुली!' असे उद्गार काढून मालकिणीने चिडून रागाने एक अडसर उचलला आणि रक्त येईल इतक्या जोराने तो तिच्या डोक्यात घातला.
खोक पडून रक्तबंबाळ झालेले आपले डोके धरून कालीने आरोळ्या ठोकून सर्व शेजारी जागे केले आणि ओरडत सुटली 'पाहा बाई माझी मालकीण! किती लीन आहे, सौम्य आहे माझी मालकीण! हे एवढे कशासाठी! तर तिची एकुलती एक मोलकरीण उशीरा उठली म्हणून! ती इतकी रागावली, चिडली होती की, हातात अडसर घेऊन माझ्यावर झेप घेऊन तिने माझे डोके फोडले! '
याचा परिणाम असा झाला की, विदेशिका ही कोणी लीन आणि सौम्य स्त्री नसून ती अत्यंत चिडखोर स्वभावाची आहे अशी तिची खात्री झाली.
याप्रमाणेच जोपर्यंत चीड आणण्याजोगे काही म्हटले नाही तोपर्यंतच, भिक्खू सौम्य, सभ्य आणि लीन असण्याचा संभव आहे. जेव्हा त्याला चीड येण्यासारखे शब्द बोलले जातात तेव्हाच त्याच्या ठिकाणी मैत्री म्हणजे बंधुभाव आहे की नाही याची खात्री पटते.
ही गोष्ट सांगून भगवतांनी म्हटले, 'केवळ वस्त्र आणि अन्न मिळविण्यासाठी भिक्खूने मैत्रीभाव व्यक्त केला तर त्याच्या ठिकाणी मैत्री भावना आहे, असे मी समजत नाही. ज्याची मैत्री भावना ही धम्म सिद्धान्तातून उगम पावते, त्यालाच मी खरा भिक्खू समजतो..
मैत्री म्हणजे चित्ताची स्वतंत्रता ती आपल्यामध्ये सर्व पुण्यकृत्यांना समाविष्ट करून घेते. ती चमकते, प्रकाशते, ती प्रज्वलित होते. '
३०. 'त्याप्रमाणेच मिक्खूंनो! जसा वर्षाऋतुअखेर सूर्य स्वच्छ, निरभ्र अशा आकाशात उगवून सारे किल्मिष नाहीसे करतो आणि स्वतः चकमतो, प्रकाशतो आणि प्रज्वलित होतो, अगदी त्याप्रमाणेच पुण्यार्जनासाठी योजलेली सर्व साधने ही मैत्रीच्या एक षोडशांश इतकी मोलाची नाहीत. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकृत्यांना आपल्यामध्ये सामावून घेऊन चमकते, प्रकाशते आणि प्रज्वलित होते. '
मैत्री भावनचे महत्व बुद्धाने करणीयमेत्तसुत्तात विशद केलेले आहे.
विपश्यना साधना शिबिरांमध्ये दहाव्या व अकराव्या दिवशी मेत्तभावनेची किंवा मैत्रीभावनेची साधना शिकविली जाते. मैत्री भावना म्हणजे सर्व प्राणीमात्राच्या कल्याणासाठी जागृत केलेला मनाचा भाव होय.
मनात मैत्रीभाव निर्माण झाल्याशिवाय व्यक्ती ख-या अर्थाने परोपकारी बनू शकत नाही. मनातील राग, लोभ आणि द्वेष हे विकार कमी झाल्यानंतरच मनात मैत्री भावनेचा उदय होतो.
म्हणूनच अष्टांगिक मार्गाचे पालन करुन मनातील विकार किंवा आसव नष्ट करुन मैत्रीभाव निर्माण करणे सदाचाराचे जीवन जगण्यास आवश्यक ठरते.