दिनांक 22 मे 2023 रोजी चैत्यभूमी दादर येथील सुरू असलेल्या केंद्रीय शिक्षिका प्रशिक्षण शिबिरात आयुष्मान राजेश पवार राष्ट्रीय सचिव यांनी सप्त बोध्यांग हा विषय शिकविला. तो पुढील प्रमाणे.
===================================
सप्त बोध्यांग समजून घेण्यापूर्वी आपण बोधिपक्षीय धम्म काय आहे ते अगोदर समजून घेऊ.
बोधिपक्षीयधम्म.
त्यावेळी भगवंतांच्या महापरिनिर्वाणाच्या तीन महिने पूर्वी भगवान कुटागार शाळेमध्ये निवास करीत होते. त्यांनी वैशालीच्या जवळपास जेवढे भिक्खु विहार करीत होते, त्या सर्वांना एकत्रित करविले. त्यांना आपली शेवटची अनुशासनपर देशना दिली. भगवंतांनी भिक्खुंना संबोधित करून म्हटले " भिक्खूनो, मी बोधिपक्षीय धम्माचा जो उपदेश दिलेला आहे तो चांगल्याप्रकारे शिकून ग्रहण करा, तशी भावना करा, चिंतन-मनन करून विकसित करा, जेणेकरून हे श्रेष्ठ जीवन मंगलमय होईल आणि ह्याने अनेकांचे कल्याण होऊन अनेकांना सुखाचा लाभ होईल."
त्याचे सविस्तर विवरण करताना भगवंतांनी म्हटले "भिक्खुंनो, मी चार स्मृती प्रस्थानांचा उपदेश दिला आहे, चार सम्यक प्रयासांचा उपदेश दिला आहे. चार - ऋद्धिपादांचा उपदेश दिला आहे. पाच इंद्रियांचा उपदेश दिला आहे. पाच बल स्थानांचा उपदेश दिला आहे.सात बोध्यांगाचा उपदेश दिला आहे आणि आर्य अष्टांगिक मार्गाचा उपदेश दिला आहे."
"भिक्खुंनो, संस्कार अनित्य आहेत, तुम्ही अप्रमादी राहून आपल्या उद्देश प्राप्तिकरिता सतत प्रयत्नशील राहा. थोड्याच दिवसात तथागतांचे परिनिर्वाण होईल. आजपासून तीन महिन्यानंतरच तथागत परिनिवृत्त होतील."
हे सर्व धम्म एकूण सदतीस आहेत म्हणून ह्यांना 'सदतीस बोधिपक्षीय' धम्म म्हणतात.
चार स्मृती प्रस्थान
१) कायानुपश्यना २) वेदनानुपश्यना ३) चित्तानुपश्यना ४) धम्मानुपश्यना
चार सम्यक प्रयास
१) अकुशल धर्माची उत्पत्ती न व्हावी म्हणून प्रयत्न करणे
२) उत्पन्न झालेल्या अकुशलांचा नाश करण्याकरिता प्रयत्न करणे.
३) उत्पन्न न झालेल्या कुशल धम्माची प्राप्ती करण्याकरिता प्रयत्न करणे.
४) उत्पन्न झालेल्या कुशल धम्माची जोपासना करण्याकरिता प्रयत्न करणे.
चार ऋद्धिपाद
१) छंद २) चित्त ३) वीर्य ४) विमर्श
पाच इंद्रिये
१) चक्षु २) श्रवणेन्द्रिय ३) नासिका ४) जिव्हा ५) त्वचा
यांशिवाय येथे श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा हेही अभिप्रेत आहेत. त्यांनादेखील 'इंद्रिये' च म्हणतात._
पाच बल
१)श्रद्धा बल २) वीर्य बल ३) स्मृती बल ४) समाधी बल ५) प्रज्ञा बल
सात बोध्यंग
१)स्मृती २) धम्म विचय ३) वीर्य ४) प्रीती ५) प्रश्रब्धि
६ )समाधी ७) उपेक्षा
आर्य अष्टांगिक मार्ग
१) सम्यक दृष्टी २) सम्यक संकल्प ३) सम्यक वाचा ४) सम्यक कर्मान्त ५) सम्यक आजिविका ६) सम्यक व्यायाम ७) सम्यक स्मृती ८) सम्यक समाधि
अशारितीने ह्या बोधिपक्षीय धम्मा द्वारे बौद्ध धम्माचा सारांश विशद केलेला आहे.
बोध्यांग
मिलिंद राजाने भंते नागसेन यांना प्रश्न विचारले.
राजा म्हणाला 'भन्ते, बोध्याङगे किती आहेत?"
महाराज, 'सात आहेत. '
भन्ते, 'किती बोध्याङगांनी धम्माचे ज्ञान होते?"
'धम्मविचय नावाच्या एका बोध्याङगानेही धम्मज्ञान होऊ शकते.' 'तर मग भन्ते, सात कशाला सांगितले आहेत. '
महाराज, 'एक तलवार म्यानात ठेवलेली आहेत. ती म्यानातून काढलीच नाही तर तिच्याद्वारे तुम्ही अपेक्षित व्यक्तीला कापू शकता काय?' 'नाही, भन्ते.
महाराज, 'त्याप्रमाणेच धम्म विषय बोध्याङगावाचून कोणतेही धम्म ज्ञान होऊ शकत नाही.
'भन्ते, आपले कथन योग्य आहे.'
१) स्मृतीची ओळख
राजाने प्रश्न केला, 'भन्ते नागसेन स्मृतीची ओळख कोणती ?"
'महाराज, बरोबर आठवण ठेवणे, हे अकुशल, दोषरहित, हे वाईट, हे चांगले आणि हे कृष्ण शुक्ल आहे असे योग्य स्मरण स्मृती बरोबर देत राहते.'
'हे चार स्मृतिप्रस्थान, या चार सम्यक प्रयास, या चार ऋद्धिपाद ही पाच इंद्रिये, हे पाच बल, सात बोध्यङग, हा आर्यअष्टांगिक मार्ग, ही विद्या आणि ही विमुक्ती आहे अशी आठवण स्मृतीमुळेच होते. त्यामुळेच योगी इष्ट धम्माचे पालन करतो आणि अनिष्ट धम्माचे पालन टाळतो. स्मृतीमुळेच तो हे करू शकतो.'
'महाराज, याप्रमाणे 'सातत्याने आठवण ठेवणे' ही स्मृतीची ओळख आहे."
विनंती करून उदाहरणासह स्पष्ट करावे.'
'महाराज, एखाद्या चक्रवर्ती राजाचा कोषपाल ज्याप्रमाणे रोज सांज सकाळ राजाला त्याच्या ऐश्वर्याची जाणीव करून देतो की, 'महाराज आपणा जवळ इतके हत्ती आहेत, इतके घोडे आहेत, इतके रथ आहेत, इतके पायदळ आहेत, इतके सोने आहे आणि इतकी संपत्ती आहे.' त्याप्रमाणे स्मृती नेहमी आठवण करून देत असते की हे कुशल आणि हे अकुशल कम्म आहे .याप्रमाणे सातत्याने आठवण ठेवणे ही स्मृतीची ओळख आहे.याप्रमाणे 'सतत स्मरण करून देणे' ही स्मृतीची ओळख आहे.'
' भन्ते 'स्वीकार करणे' ही स्मृतीची ओळख कशी ?"
'महाराज, स्मृती निर्माण होऊन कोणते धम्म हिताचे व कोणते अहिताचे याचा छडा लावते आणि हे धम्म अहिताचे, हे धम्म कल्याणकारी आणि हे धम्म अकल्याणकारी आहेत, असा निर्वाळा देते. त्यामुळे योगी अहितकारक धम्माचा त्याग करून हितकारक धम्माचा स्वीकार करतो. अकल्याणकारी धमांचा (कम्माचा )त्याग करून कल्याणकारी धम्माचा स्वीकार करतो. महाराज याप्रमाणे 'स्वीकार करणे' ही स्मृतीची ओळख आहे.
'भन्ते, आपले म्हणणे योग्य आहे. '
स्मृतीची उत्पत्ती
राजा म्हणाला : ‘भन्ते सर्वच स्मृती मनामुळे निर्माण होतात की काही बाहेरच्या वस्तूंमुळे सुद्धा?' महाराज, 'मनाद्वारेही निर्माण होतात आणि बाहेरच्या वस्तूंमुळेसुद्धा.
भन्ते, 'सर्व स्मृती मनामुळेच निर्माण होत असतात. बाहेरच्या वस्तूंमुळे नव्हे.' महाराज, 'जर बाहेरच्या वस्तूंमुळे स्मृती होत नाही तर दुसन्याकडून शिल्पकलेचे शिक्षण घैणे आणि शिकविणारा गुरु हे सर्वच व्यर्थ होईल. परंतु असे तर आदळत नाही.'
स्मृतीच्या निर्मितीचे १६ प्रकार
राजा म्हणाला 'भन्ते, स्मृती किती प्रकारांनी उत्पन्न होते?"
महाराज, सोळा प्रकारे स्मृती निर्माण होते. ते सोळा प्रकार असे :-
(१) 'अभिज्ञेने (पूर्वज्ञान) स्मृती निर्माण होते.
'ती कशी ?'
'भिक्खू आनंद, उपासिका खुज्जुत्तरा किंवा अन्य काही लोकांची स्मृती लोकोत्तर होती. त्यांना आपल्या पूर्वजन्मीच्या गोष्टींचे सुद्धा स्मरण होत असे.'
(२) 'बाहेरच्या वस्तूंमुळे स्मृती उत्पन्न होते.''ती कशी ? एखाया विसरभोळया माणसाच्या शेल्याच्या पदराला गाठ बांधली म्हणजे त्या गाठी मुळे त्याला स्मरण होते.
(३) 'एखादी महत्वाची घटना होणार असल्यामुळे स्मृती उत्पन्न होते.''ती कशी ?"
'एखाद्या राजाच्या अभिषेकाची तयारी चालु असली किंवा स्त्रोतापति फळाची प्राप्ती होणार असली तर सर्वांना स्मरण राहते. या मोठया घटना आहेत. '
(४) 'एखाद्या घटनेमुळे फार आनंद झाल्यास त्या घटनेचे स्मरण राहते.'"ते कसे ?"
'अमुक तमुक ठिकाणी आपणाला फार आनंद वाटला होता, अशी आठवण राहते. '
(५) 'दुःखदायक घटना घडल्यामुळेही तिचे आपणास स्मरण राहते. ''ते कसे ?'
'अमुक तमुक जागी आपणाला फार दुःख भोगावे लागले, अशी आपणास आठवण राहते.'
(६) 'दोन वस्तूंमध्ये सारखेपणा असल्यामुळे एक पाहताच दुसरीचे स्मरण होते.'"ते कसे ?"
'आई, बाप, भाऊ, किंवा बहिणी प्रमाणे चेहरा असलेल्या दुसऱ्या व्यक्ती स पाहताच आपणाला त्यांचे स्मरण होते. किंवा एखादा उंट, बैल अथवा गाढव पाहताच त्याच्या सारखाच असलेल्या दुसऱ्या उंटाची, बैलाची किंवा गाढवाची आठवण होते.'
(७) 'दोन विरोधी वस्तु असल्या तर एकी ला पाहताच दुसरीचे स्मरण होते.''ते कसे ?'
"लोकांच्या विरूद्ध असलेल्या माणसाचे रूप, शब्द याचे स्मरण राहते किंवा विलक्षण वस्तूची चव, गंध, रूप, स्पर्श इत्यादींचे स्मरण राहते. '
(८) 'दुसऱ्याच्या सांगण्या मुळे आठवण येते.' ती कशी?
'दुसऱ्या माणसाने रंग, रूप चवीचे वर्णन केल्यामुळे आपणास स्मरण होते.'
(९) 'एखादी खूण पाहून स्मृती होते.'ती कशी ?"
'एखादी खूण पाहताच एखाद्या विशिष्ट बैलाचे स्मरण होते.'
(१०) प्रयत्न करण्यामुळे विसरलेल्या गोष्टींचे स्मरण होते. "ते कसे ?'
'एखादा विसरभोळा माणूस असतो. त्याला दुसरा माणूस जेव्हा 'आठवण करा आठवण करा असा तगादा लावतो तेव्हा तो आठविण्याचा प्रयत्न करतो व मग त्याला आठवण येते.'
(११) 'विचार करण्यामुळे स्मरण होते.''ते कसे?'
'लेखकाच्या चटकन लक्षात येते की या अक्षरानंतर हे अक्षर यावयास पाहिजे.'
(१२) 'हिशेब करण्यामुळे काही गोष्टींचे स्मरण होते.' "ते कसे ?"
'हिशेबात प्रवीण असणारे लोक मोठमोठया बेरजा चटकन करून टाकतात. '
(१३) 'मुखोद्गत केलेल्या गोष्टींचे चटकन स्मरण होते. '
'ते कसे ?'
'पुन्हा पुन्हा घोकून पाठ करणाऱ्या लोकांच्या लक्षात त्या गोष्टी पक्क्या राहतात. '
(१४) 'इच्छाशक्ती मुळेही स्मरण होते.'ते कसे?
‘भिक्खू इच्छाशक्ती द्वारे आपल्या पूर्वजन्मीच्या गोष्टींचे स्मरण करतो. एका जन्मीच्या गोष्टी, दोन जन्मापूर्वीच्या गोष्टी आकार प्रकारांनी आठवतो. '
(१५) ग्रंथात पाहिल्यामुळे काही गोष्टींचे स्मरण होते.''ते कसे ?'
'वकील एखादा कायदा योग्यपणे पाहण्यासाठी नोकराला आज्ञा देतो की 'एखादे पुस्तक आण' ते पुस्तक पाहिल्यानंतर त्याला त्या कायद्याचे बरोबर स्मरण होते.'
(१६) 'पूर्वानुभवामुळे एखाया गोष्टीचे स्मरण होते. ''ते कसे ?'
'पूर्वी पाहिलेल्या वस्तूंच्या रूपाची आठवण होते. पूर्वी ऐकलेले शब्द स्मरतात, घेतलेल्या गंधाची स्मृती ताजी होते. चाखलेल्या स्वादांची स्मृती होते, आणि पूर्वी अनुभवलेल्या स्पर्शाचीही आठवण राहते. माहित असलेल्या धर्माचे ही स्मरण होते.
महाराज ,अशा सोळा प्रकारे स्मृती होत असते.
२) धम्म विचय बोध्यांग :
सत्य इच्छा, सत्य मार्गावर आरुढ होण्याची, उभे राहण्याची हिम्मत ठेवून धम्म मार्गावर आरुढ होण्याची श्रद्धा निर्माण होते. खोटया मार्गापासून दूर राहण्याचा प्रयत्न करणे. खोटा मार्ग आणि खरा मार्ग जाणून घेणे. याला धम्म प्रविचय बोध्यांग म्हणतात. नेहमी सत्य मार्गाचा ध्यास असणे. सत्यापासून दूर न होता आपले जीवन व्यतित करणे म्हणजे धम्मविचय बोध्यांग होय.
३)वीर्य बोध्यांग
वीर्य या बोध्यांगा ची व्याख्या पुढीलप्रमाणे आहे.
"वीर्य म्हणजे योग्य (सम्यक) प्रयत्न. हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे म्हणजे वीर्य,
वीर्य बोध्यांग हे अष्टांगिक मार्गातील सम्मादायामो या अंगाशी साम्य दर्शविते. अष्टांगिक मार्गाचे पालन करण्यासाठी लाभदायक अशा चित्तवृत्ती निर्माण करणे हे या वीर्य बोध्यांगाचे उद्दिष्ट आहे.
शक्तीवान, धैर्यवान राहणे म्हणजे विर्यबोध्यांग. धम्म अभ्यासात नेहमी उत्साहित असणे, सतत धम्म कार्य करण्यास तत्पर राहणे. आता फार थंडी आहे, आता फार गरम होत आहे, आता फार पाऊस आहे. आता तर आरामाची वेळ आहे अशी काही ना काही कारणे सांगून कार्यापासून दूर न राहता कार्य करणे. आळस हा प्रगतीच्या मार्गातला फार मोठा शत्रू आहे. उत्साहासंबंधी आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात खडतर अडचणींवर मातकरुन देशात-विदेशात जाऊन आपला संकल्प पुरा केला त्याचे उदाहरण लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्याकडे पुरेसे धन नव्हते. पुरेसे अन्न नव्हते. परदेशात शिक्षण घेत असताना, अठरा अठरा तास अभ्यास केला. सकाळी ग्रंथालयात गेल्यावर जेवणासाठी जात नव्हते. त्याची दोन कारणे होती. जेवणास बाहेर गेले तर अर्धा-एक तास वेळ वाया जाणार हे एक कारण व दुसरे कारण त्यांच्याकडे पुरेसा पैसा नव्हता. म्हणून सकाळी जाताना एक पाव खिशात न्यायचे आणि बाकीचे विद्यार्थी जेवायला बाहेर गेल्यावर ते कोरडाच खात असत; तेही पुस्तक वाचता वाचता. त्यामुळे वेळेची बचत होत होती व अभ्यास उरकत होता. म्हणून चांगल्या कामा विषयी नेहमी उत्साह असणे म्हणजे वीर्य बोध्यांग होय.
मिलिंद राजाने भंते नागसेन यांना प्रश्न विचारला.
भंते वीर्याची ओळख कोणती?
भंते नागशेन म्हणाले'महाराज 'दृढ करणे' ही वीर्याची ओळख आहे. जे पुण्यधर्म वीर्यामुळे दृढ केल्या जातात ते कधीही डगमगत नाहीत. '
'विनंती करून उदाहरणासह स्पष्ट करावे.'
'महाराज, आपले घर पडत असलेले पाहून एखादा माणूस खांबाचा आधार देऊन त्याला मजबूत करतो. त्यामुळे ते घर पडू शकत नाही. त्याप्रमाणेच वीर्यांने मजबूत केलेले सर्व पुण्यधम्म डगमगत नाहीत.
'विनंती करून पुन्हा उदाहरणासह स्पष्ट करावे.'
'महाराज, समजा की एका मोठ्या सैन्याने तुमच्या एका लहान सैन्याचा पराभव केलेला आहे. तेव्हा हरलेल्या आपल्या सैन्याला काही नवीन सैन्याची कुमक देऊन ते सैन्य पुन्हा लढण्यासाठी पाठविले. आता मात्र या सैन्याने जाऊन त्या मोठया सैन्यास पराजित केले. महाराज याप्रमाणेच दृढ करणे ही वीर्यांची ओळख आहे. भगवंतानीही सांगीतले आहे की, 'भिक्खूंनो वीर्यवान आर्य श्रावक पाप वगळून पुण्यग्रहण करतो. दोषयुक्त टाळून निर्दोषाचे ग्रहण करतो. आणि स्वतःला शुध्द राखतो. '
४) प्रिती बोध्यांग :
एकाग्र चीत्ताचा आनंद मानणे, आपुलकी बाळगणे म्हणजे प्रिती बोध्यांग. ध्यान साधनेत सुविचाराचा, अविचाराचा जो प्रितीभाव उत्पन्न होतो त्यालाच प्रिती बोध्यांग म्हणतात. जेव्हा चीत्त शिथील होते, तेव्हा उत्साहाबरोबर प्रिती शिथील होते. चित्ताला राग, द्वेषापासून, मोहापासून तृष्णेपासून मुक्त ठेवणे म्हणजेच प्रिती बोध्यांग. आपले मन फार चंचल आहे, चपळ आहे. ते सारखे तृष्णेच्या मागे धावत राहते. त्याकरीता मनाला सतत ध्यान साधनेत बांधून ठेवले पाहिजे. जर का ते तृष्णेच्या मागे पळाले तर दुःख निर्माण होते. त्यामुळे प्रसन्नता रहात नाही. आनंदीपणा रहात नाही. प्रिती म्हणजे आनंद, उत्साह, सुख मनाला शुद्ध निर्मळ ठेवल्याने सुखाची अनुभूती होते. संबोधी प्राप्त करतांना प्रीत एक अलौकीक अनुभव आहे. म्हणून भगवान म्हणतात. मनाला शुद्ध ठेवा. धम्म पदात भगवान बुद्ध म्हणतात |
मनो पुब्बङग्मा धम्मा मनो सेवा मनोमया ॥
मनसा च पुदुटठेन भासति वा करोती वा ॥
ततोनं दुःखमन्वेति चक्कं व वहतो पदं ॥
सर्व कायीक, वाचिक, मानसिक कर्म या सुख-दुःख आदि अनुभवाच्या अग्रभागी माणसाचे मन असते. जेव्हा माणूस मलिन मनाने बोलतो किंवा कार्य करतो तेव्हा दुःख त्याच्या मागे येते. ज्या प्रमाणे बैल गाडी ओढताना गाडीची चाके बैलाच्या मागे जशी फिरतात तशी कर्मे फिरतात. प्रितीचे पाच प्रकार सांगितले आहेत. ते खालीलप्रमाणेः
१) सामान्य सुखाची अनुभूती.
२) क्षणिक सुखाची अनुभूती.
३)अति खोलवर सुखाची प्रीती
४) उत्साहपुर्ण प्रीती,
५) धुंद प्रकारची प्रीती, अशी पाच प्रकारची प्रीती असते.
५) प्रश्रब्धि बोयांग
प्रश्रब्धि बोध्यांग म्हणजेच परमशांती, भगवान बुद्धाने म्हटले आहे. प्रितीयुक्त मनाचे कारण चित्त आणि शरीराची शांती, गंभीरता प्राप्त हे आहे. (बुद्ध) पदात तथागत म्हणतात-
सब पापरस अकरण | कुसलस्स उपसंपदा । सचित परियोदपनं येतं बुद्धान शासनं ।। 1
या धम्मपदात संपूर्ण धम्माचे सार भगवंताने सांगितले आहे. काया-वाचा-मनाने पाप कर्म करू नका. सतत चित्ताची शुद्धी ठेवा. मनाला राग, द्वेष, तृष्णाविरहित ठेवा कारण माणसाच्या मनातच पाप किंवा पुण्याची तृष्णा निर्माण होते आणि मनुष्य त्याप्रमाणे कर्म करतो. काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मत्सर या षडविकारापासून मनाला अलिप्त ठेवण्यासाठी प्रश्रब्धि बोध्यांग महत्वाचे आहे.
६) समाधी बोध्यांग
समा + आधी याचा अर्थ चित्ताची योग एकाग्रता ठेवणे. मनातील वाईट विचार काढून टाकण्यासाठी हे बोध्यांग महत्वाचे आहे. बौद्ध धम्मात ध्यान साधनेला फार महत्व आहे. समाधी बोध्यांग म्हणजे कुशल चित्त. राग, द्वेष, मोह विरहीत शुद्ध चित्ताची एक स्थिती आहे. या बोध्यांगाने चित्त विकसित, शुद्ध, निर्मळ होते. शांत होते आणि तो मनुष्य सद्वर्तनी, सदाचारी, शीलवान गणला जातो.
महासतीपठ्ठन सुत्तात बुद्ध समाधी बद्दल अशी व्याख्या करतात .
भिक्खूंनो, काय आहे सम्यक समाधी ? इथे भिक्खूंनो, भिक्खू, अकुशल मनोवृतीपासून विरत होऊन वैराग्य, विवेक, वितर्क यांनी परिपूर्ण प्रीती आणि सुख देणा-या ध्यानाच्या अवस्थेत प्रवेश करतो अणि तेथे स्थानापन्न होतो.
वितर्क आणि विचार शांत झाल्यानंतर प्रश्रब्धि आणि मनाची एकाग्रता साधताना तो वितर्क रहित, विचार रहित प्रिती सुख देणा-या ध्यानाच्या दुस-या अवस्थेत पोहचतो आणि तेथेच स्थानापन्न होतो.
प्रीती नाहीशी झाल्यानंतर तो उपेक्षा भावात रममाण होतो, अनित्य बोधाच्या सतत जाणीवेने तो जागरूक होतो, आणि तो आपल्या कायेत अशा सुखाची अनुभूती घेतो; ज्याविषयी आर्य उपासक म्हणतात, 'हे सुख उपेक्षा आणि जागरूकता युक्त व्यक्तींनी अनुभवले आहे.' अशाप्रकारे तो ध्यानाच्या तिस-या अवस्थेत पोहचतो आणि तेथेच स्थानापन्न होतो.
सुख आणि दु:खाच्या निरोधानंतर, आणि चित्ताचा उल्हास आधीच नष्ट झाल्यामुळे, तो सुख-दुःख रहित अवस्थेला पोहचतो. या ध्यानाच्या चौथ्या अवस्थेत उपेक्षा आणि जागरूकता यामुळे पूर्णतः शुद्धता साधली जाते आणि तो तेथे स्थानापन्न होतो. यालाच सम्यक समाधी असे म्हणतात. "
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मतानुसार लोभ, द्वेष, आळस आणि सुस्ती, संशय, अनिश्चिय हे पाच अडथळे मनातून दूर होणे आवश्यक असते. त्यांच्या मते समाधीच्या मार्गाने हे अडथळे दूर करता येतात. अष्टांगिक मार्गाच्या इतर सात अंगांचा अभ्यास करण्यासाठी हे अडथळे दूर करणे आवश्यक असते. याची आवश्यकता पटल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सम्यक समाधीविषयी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात विवेचन करताना लिहितात.
“परिव्राजकहो, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मान्त, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणा-या माणसांच्या मार्गावर पाच अडथळे किंवा बंधने असतात. "
"लोम, द्वेष, आळस व सुस्ती, संशय आणि अनिश्चय हे ते पाच अडथळे होत. म्हणून हे अडथळे दूर करणे आवश्यक आहे. हे अडथळे म्हणजे बंधनेच होत; आणि ते दूर करण्याचा मार्ग समाधी हा होय. परंतु परिव्राजकहो, सम्यक समाधी म्हणजे समाधी नव्हे हे लक्षात घ्या. तिचे स्वरूप अगदी निराळे आहे. "
"समाधी म्हणजे केवळ चित्ताची एकाग्रता. वरील पाच अडथळ्यांना अटकाव करणा-या स्वयंप्रेरित अशा ध्यानावस्थांच्या मार्गावर ती आपल्याला नेते यात शंका नाही. "
"परंतु या ध्यानाच्या अवस्था तात्पुरत्या असतात. त्यामुळे अडथळ्यांना केलेला अटकाव हा देखील तात्पुरताच ठरतो. मनाला स्थायी स्वरूपाचे वळण लावणे हे आवश्यक आहे. अशाप्रकारचे कायम स्वरूपाचे वळण केवळ सम्यक समाधीनेच लावता येईल."
समाधीमुळे अडथळ्यांना फक्त तात्पुरता अटकाव होतो, म्हणून ती केवळ नकारात्मक स्थिती होय. तिच्यात मनाला वळण लावले जात नाही. सम्यक समाधी ही वास्तवात्मक असते. ती मनाला एकाग्रतेचे आणि एकाग्रतेच्या काळात कुशल कर्माचा विचार करण्याचे शिक्षण देते, आणि त्याला अनुसरूनच अडथळ्यामुळे निर्माण होणा-या अकुशल कर्माकडे आकर्षित होण्याची मनाची प्रवृत्तीही ती नष्ट करते. "
सम्यक समाधी मनाला चांगल्या गोष्टींचा विचार करण्याची व चांगल्या गोष्टीचाच नेहमी विचार करण्याची सवय लावते. सम्यक समाधी चांगल्या कृति करण्यास आवश्यक अशीच प्रेरणा मनामध्ये निर्माण करीत असते. "
अशाप्रकारे सम्यक समाधी ध्यानाच्या अवस्था विकसित करण्याला मदत करते. यामुळे मनाला चांगल्या गोष्टींचा विचार करण्याची आणि चांगली कृती करण्याची आवश्यक अशीच प्रेरणा निर्माण करण्याची सवय लागते. आनापानसति च्या अभ्यासामुळे अशा ध्यानाच्या अवस्था प्राप्त करता येतात.
महासतीपठ्ठन सुत्तामध्ये ध्यानाच्या चार अवस्था सांगितल्या आहेत. या ध्यानाच्या चार अवस्थांमध्ये आणि सात बोध्यंगामध्ये पूर्णतः साम्य आहे. आनापानसति चा अभ्यास हे सात बोध्यंग विकसित करते. हे तथागताने मज्झिमनिकाया तील आनापनसति सुत्तात सांगितले आहे.
अशाप्रकारे आनापानसति चा अभ्यास हा सम्यक समाधीचा अभ्यास आहे.
७) उपेक्षा बोध्यांग
उपेक्षेची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे:
“उपेक्षा म्हणजे औदासीन्याहून निराळी अशी अलिप्तता, अनासक्ती, आवड किंवा नावड नसलेली ती एक मनाची स्थिती होय. फलप्राप्तीने विचलित न होणे; परंतु निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे म्हणजेच उपेक्षा.
आपल्या दैनंदिन जीवनात आपण काया, वाचा आणि मनाने केलेल्या कृतीचा नेमका असा परिणाम घडून येतो. अनेकदा हा परिणाम दुःखदायक असतो. काही परिणामांमुळे आनंद प्राप्त होतो आणि काही परिणामांमुळे व्यक्ती दुःखी होते.
तथापि, उपेक्षेचा भाव ज्याच्या मनात निर्माण झालेला आहे अशी व्यक्ती अशा परिणामाने प्रभावित होत नाही. परिणाम काहीही असला तरी सुखी किंवा दु:खी होत नाही.
उपेक्षा म्हणजे समतोलपणा राखणे आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये अनित्य बोध जागवून कृती करणे. याचाच अर्थ सर्व प्रकारच्या संवेदनामध्ये विदयमान असलेला अनित्य स्वभाव जाणणे होय.
No comments:
Post a Comment