आज दिनांक 6 जुलै 2024 रोजी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा रायगड दक्षिण जिल्हा शाखेचे अध्यक्ष संतोष जाधव यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक महाड येथे कार्यकर्ता /चिंतन प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले .
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव राजेश पवार व महाराष्ट्र राज्य शाखेचे उपाध्यक्ष व माजी राष्ट्रीय कोषाध्यक्ष डी टी सोनवणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता/चिंतन प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले.
राष्ट्रीय सचिव आदरणीय राजेश पवार यांनी आजच्या कार्यकर्ता/ चिंतन प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन केले. कार्यकर्ता/चिंतन प्रशिक्षण शिबिरात ओळख परिचय झाल्यानंतर राष्ट्रीय सचिव राजेश पवार यांनी प्रशिक्षणार्थींची ऑनलाइन पूर्वार्ध चाचणी परीक्षा घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा शाखेचे सरचिटणीस आदरणीय नवनीत साळवी गुरुजी यांनी केले.
आभार प्रदर्शन रायगड जिल्हा शाखेचे कोषाध्यक्ष आदरणीय प्रदीप मोहिते गुरुजी यांनी केले .
आजच्या कार्यकर्ता /चिंतन शिबिरामध्ये पुढील प्रमाणे विषय घेण्यात आले.
१) प्रशिक्षण शिबिर उद्घाघाटन व परिचय .
2) दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ध्येय उद्दिष्टे व मिशन
3)शाखेचे कामकाज कसे करावे आणि हिशोब कसा लिहावा .
4)कार्यकर्त्याची आचारसंहिता आणि प्रबोधनाची आचारसहिता .
5)पदाधिकाऱ्यांची जबाबदारी
6)मनोगत
7)उत्तरार्ध ऑनलाइन चाचणी परीक्षा
8)अध्यक्षिय भाषण
9)सरणतय
माजी राष्ट्रीय कोषाध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय डी टी सोनावणे गुरुजी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती गतिमान कशी होईल या विषयावर मार्गदर्शन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती गतीमान कशी करावी? अर्थात बीएसआय मिशन
पूर्वपीठिका
प्राचिन वैदिक कालापासून मनुस्मृति नुसार अस्पृश्य स्त्री/पुरुषांना चार वर्णाच्या (ब्राम्हण, श्रत्रिय, वैश्य, शुद्र) स्त्री यांना स्वतंत्र्य, समानता तसेच शिक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवले होते. त्यांना धर्म रुढी परंपरा या नावाखाली गुलामीत ठेवले होते. अस्पृश्यांना कुत्र्या-मांजरा पेक्षाही हिन वागणूक होती. त्यांचा स्पर्श व थुंकिचा विटाळ होत होता म्हणून गळ्यात मडके व पाऊल खुणा दिसू नयेत म्हणून कमरेला खराटा होता.
डॉ. बाबासाहेब यांची धम्मक्रांती.
जगाचा इतिहास पाहता जगात अनेक क्रांत्या झाल्यात, फ्रांस मध्ये (फ्रेंच राज्य क्रांती) तीन १७८९, १८३० आणि १८४८ च्या क्रांतीने राजेशाही आणि प्राचिन राजवट खाली आणली. त्याचा परिणाम राजा लुई सोळावा आणि त्याची प्रसिध्द पत्नी मेरी ॲंटोइनेट यांचा शिरच्छेद झाला.
प्रबोधनाच्या नवीन कल्पनांनी प्रभावीत होऊन अमेरिकन क्रांती १७६५ ते १७८३ या कालावधीत घडली. युरोपात १८४८ मध्ये गरीब, बेरोजगार आणि उपासमार असलेल्या शेतकरी आणि कामगारांच्या विद्रोहा सह सुशिक्षित मध्यम वर्गाने सुरु केलेल्या विविध राष्ट्रीय चळवळींचा आहे. या सर्व क्रांत्या रक्तरंजीत ठरल्या आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे संविधान लिहिले, संविधानाच्या माध्यमातून चातूवर्णाच्या विषमतेतून मुक्त करून समता प्रस्तापित केली.
उदा. १) समानता (संविधान कलम १४ ते १८) सर्वांना समान वागणूक, कायद्यापुढे समान, धर्म, वंश, जात किंवा लिंग, जन्मस्थान यावरुन कोणताही भेदभाव नाही व अस्पृश्यता नष्ट केली आहे.
२) स्वातंत्र्य (संविधान कलम १९ ते २१) व्यक्तिगत स्वातंत्र्य तसेच भाषण, लिखान, भारतात कोठेही फिरणे, राहणे, स्थायीक होणे व व्यवसाय, व्यापार किंवा धंदा करणे आणि
३) धार्मिक स्वातंत्र्य (संविधान कलम २५ ते २८) कोणताही धर्म स्वीकारणे व आचरण करणे.
धार्मिक स्वातंत्र्याचा अंगीकार करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली नागपुर मुक्कामी विषमतावादी हिंदु धर्माचा त्याग करून समतावादी बौध्द धम्माचा स्विकार केला. रक्ताचा एकही थेंब न सांडता जागतिक अशी धम्मक्रांती केली आहे.
संविधान व धम्मक्रांती मूळे स्वाभिमान, स्वातंत्र्य, समता, न्याय व शिक्षण, नोक-या, अधिकार पदे मिळाली. सामाजिक स्थर उंचावला, विकास, प्रगती झाली.
धम्मक्रांती मागे घेण्यासाठी विरोधकांची कार्यवाही
संविधानाला हिनवने, संविधान चांगले नाही हा अपप्रचार करणे, संविधानाला गोधडीची उपमा दिली, त्यातील तीन रंग हे अशुभ असल्याचा अपप्रचार करणे.
इथल्या एस.सी / एस. टी. वर अत्याचार करणे, शिक्षणातील आरक्षण संपविणे, शिष्यवृत्ती बंद करणे, खाजगीकरण, उदारीकरण तसेच जागतिकीकरण करणे इत्यादि. देशाच्या नविन संसद भवनाच्या पाया भरणी साठी त्यावेळचे राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांना बोलावले नव्हते.. तसेच संसद भवनाच्या उद्घघाटन प्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना सुद्धा निमंत्रित केले नाही.
हिंदुराष्ट्राची संकल्पना अर्थात धर्मावर आधारीत (मनुस्मृती प्रमाणे) नविन संविधान तयार करणे. संविधानातील कलम १५ रद्द करण्याचा त्यांचा मनसुबा आहे.
संविधानातील कलम २५ नुसार प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्य (Right to Religion) तसेच कलम २१ नुसार व्यक्तिगत स्वातंत्र्य (Right to choice of an Individual) दिलेले असतांना देखील धर्मांतरातील २२ प्रतिज्ञा वर बंदी घालणे, लव जिहादच्या नावाखाली कर्नाटक, उत्तरप्रदेश, गुजरात, छत्तीसगढ, ओरिसा, मध्यप्रदेश, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड आणि हरियाणा या सर्व राज्यात धर्मांतर विरोधी कायदे करण्यात आले आहेत.
मा. गुजरात उच्च न्यायालयाने, गुजरात राज्याचा (The Gujrat Freedom of Religion Act, 2021 ) हा कायदा ऑगस्ट २०२१ मध्ये रद्द केला आहे.
धम्मक्रांती गतिमान करण्याचा संकल्प
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून व बौध्द धर्मांतर करुन चातुर्वर्णाच्या विषमतेतून, गुलामगिरीतून बाहेर काढले व देशात समता प्रस्थापित केली. त्यामुळे आपण स्वाभिमानी, समतावादी बनून शिक्षण घेऊन नोकऱ्या मिळविल्या, अधिकार पदे मिळाली, आपली सामाजिक व शैक्षणिक प्रगती व विकास झाला. परंतू समतेचे विरोधक व विषमतेचे पुरस्कर्ते यांना संविधान बदलून धर्मावर आधारित संविधान व राष्ट्र बनवायचे आहे. शिक्षणातील व नोकरीतील आरक्षण संपविण्यात येत आहे. खाजगीकरण व कंत्राटीकरण चालू आहे. मागसवर्गीयांवर अन्याय अत्याचार इत्यादीमुळे देशात असहिष्णुतेचे वातावरण निर्माण झाले असून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न होत आहे .त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती अधिक गतिमान करण्यासाठी आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय यावर आधारित भारताचा आदर्श नागरिक बनविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर (राष्ट्रीय कार्याध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष, समता सैनिक दल) यांनी २०२४-२५ पर्यंत करोडो लोकांचे धर्मांतर अर्थात घरवापसी करण्याचा संकल्प ६६व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी ५ ऑक्टोबर २०२२ रोजी नागपूर येथे केला आहे.
आठ गोल्डन मार्गाचा अवलंब करावा
संकल्प पूर्ण करण्यासाठी ज्याप्रमाणे तथागत भगवान बुध्द यांनी माणसाच्या जीवनात प्रगती होण्यासाठी आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे ८ गोल्डन पाथ ऑफ लाइफ सांगितलेले आहेत त्याप्रमाणे खालील ८ गोल्डन मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे.
१. चलो बुध्द की ओर अभियान जातीअंताची चळवळ:
चोवीस पॉइंट प्रोग्राम (शिबीरे) गावागावापर्यंत करणे. बहुजन समाज संघटना, समविचारी संस्था / संघटना सोबत समन्वय साधून धर्मांतर - घरवापसी परिषदा घेणे (इतर धर्मावर टिका टिप्पणी न करता.) धम्म परिषदा, धम्म मेळावे, धम्म रथ गावागावात फिरवणे. राष्ट्रपुरुष राष्ट्रसंत जयंती / पुण्यतिथी कार्यक्रमात सहभागी होणे.
२. आचारो परमो धम्मो :
बौध्द धम्माचे काटेकोरपणे आचरण करणे.
३. बुद्धिस्ट आयडेंटिटी (बौध्द की पहचान) निर्माण करणे:
केवळ जयभीम वाले अशी ओळख न होता संस्कारामधून बौध्द म्हणून ओळख होणे गरजेची आहे. संस्कारामध्ये एकसूत्रीपणा आणने व बौध्द लिखो अभियान (शाळा प्रवेशा वेळी धर्म बौध्द लिहिणे व जातीचा दाखला बौध्द करुन घेणे), बौध्द सभासद बनो अभियान (भारतीय बौध्द महासभेचे सभासद करणे) राबविणे.
४. टिम वर्क करणे :
कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी लिच्छविचे सात नियम पाळून काम करणे. टिमवर्क म्हणजे सर्वांनी मिळून एकत्रित समन्वयाने काम करणे (Total Efforts by All Members), वाद, मतभेद, लावालावी, निंदा, अपमान, इत्यादी न करणे.
५. धर्मांतरीतांच्या बरोबर रोटी-बेटी व्यवहार करणे :
धर्मांतर झालेल्या व्यक्ती / समाजाबरोबर रोटी-बेटी व्यवहार करणे तसेच त्यांना संघटनेमध्ये योग्य स्थान देणे.
६. बुध्दविहार जोडो अभियान :
बुध्दविहार संस्था / संघटना / यांचेशी समन्वय साधून विविध कार्यक्रम घडवून - आणणे, बुध्दविहार नोंदणी करणे.
७. मंडळ जोडो अभियान :
समाजातील युवक, महिला, जयंती मंडळे संस्थेबरोबर समन्वय साधून गाव / वार्ड पातळीपर्यंत शाहूवाडी पॅटर्नप्रमाणे शाखानिर्माण करणे. (गाव तिथे शाखा, शाखा तीथे बौद्धाचार्य, एक घर एक सैनिक)
८. समाजाशी नाळ जोडणे:
समाजातील डॉक्टर, वकिल, व्यवसायिक आणि प्राध्यापक, शिक्षक, सरकारी / निमसरकारी / खाजगी अधिकारी इत्यादी जोडो अभियान राबविणे त्यासाठी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मोफत सहाय्यता व सल्ला केंद्र निर्माण करणे.
जर आपण डॉ. बाबासाहेबांची धम्मक्रांती गतिमान करण्यासाठी वरील आठ मार्गांचा अवलंब केला नाहीतर पुन्हा पेशवाई येवून गळ्यात मडके व कमरेला खराटा येऊ शकतो (सांकेतिक) त्यामुळे आपण सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुया.
प्रबोधनाची आचारसंहिता हा विषयावर मार्गदर्शन करताना डी टी सोनवणे गुरुजी यांनी पुढील प्रमाणे मार्गदर्शन केले
1. प्रबोधन करतांना संस्थेच्या चालू घडामोडी व उपक्रमा बाबतची माहिती जनतेला द्यावी,
जसे सभासद नोंदणी अभियान इत्यादी.
2. प्रबोधनकार हा बौध्दाचार्य, प्रशिक्षित श्रामणेर, प्रशिक्षित अंधश्रध्दा निर्मुलन शिबीर, व्यक्तिमत्व विकास शिबीर, केंद्रीय शिक्षक / शिक्षिका शिबीर यामध्ये बसलेला असावा.
3. प्रबोधन / प्रवचन करतांना, विषय मांडतांना महापुरुषांचे वचन सांगतांना भेसळ करु नये.
4. प्रबोधन करतांना विषय समजून घेणे, विषयाला सोडून बोलू नये.
5. बोलतांना प्रस्तावना खूप लांबलचक नसावी.
6. सकारात्मक पध्दतीने बोलावे.
7. आपल्या कामामध्ये आणि हिशेबामध्ये पारदर्शकता असावी.
8. सभागृहामध्ये समोर बघून बोलावे.
9. सामाजिक व धार्मिक भान ठेवून बोलावे. (टीका/ टीप्पणी करु नये, देवाधर्मावर बोलू नये.)
10. कार्यकर्त्यांमध्ये सुसंवाद राहील असे प्रबोधन करावे.
11. प्रत्येक धम्मप्रचारकाचा विषय लिखित असावा.
12. दिलेल्या वेळेत विषय संपवावा.
13. कार्यकर्त्याने वाचेवर संयम ठेवावा, सम्यक वाचेचे पालन करावे.
14. मार्गदर्शन करतांना किंवा विधी करतांना आपले उच्चार स्पष्ट असावेत.
15. मार्गदर्शन करतांना स्वत:चा इतिहास, प्रौढी, मोठेपणा सांगत बसू नये.
16. मार्गदर्शकाने बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुध्द आणि त्यांचा धम्म, शुद्र पूर्वी कोण होते ? अस्पृश्य मुळचे कोण ? पाकिस्तानची फाळणी, जातीअंताचा लढा आणि मुक्ती कोण पथे ?, क्रांती आणि प्रतिक्रांती किमान ही पुस्तके वाचावीत.
राष्ट्रीय सचिव राजेश पवार यांनी हिशोब कसा ठेवायचा या विषयावर पुढील प्रमाणे मार्गदर्शन केले.
शाखा कार्यालयीन कामकाज व शाखेचा हिशोब
अ) पार्श्वभूमी-
बायलॉज दि. २९/८/२००० च्या वार्षिक सभेमध्ये स्विकृती
प्रकाशन दि. १७/९/२००० (भय्यासाहेब आंबेडकर स्मृती दिन) रोजी चैत्यभूमी येथे आद. महाउपासिका मिराताई आंबेडकर यांच्या हस्ते (बायलॉज समिती दि. २/३/२००० रोजी नियुक्ती, अध्यक्ष एस. के. भंडारे, राष्ट्रीय महासचिव)
ब) बायलॉज
एकुण १० कलमे व ८ परिशिष्ठे त्यामधील कार्यालयीन कामकाजा बाबतची खालीलप्रमाणे माहिती
सारांशाने देत आहोत. कलम VIII कार्यालयीन कामकाज आणि नियम
अ) कामकाज / हिशोबाचे वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च
बी) कामकाजाचे दिवस आठवड्यातील कमीत कमी ३ दिवस (गुरुवार, रविवार, पोर्णिमा सोडून)
सी) १. वरीष्ठ शाखेकडून प्राप्त झालेले पत्र / आदेशानुसार कार्यवाही करीत असले बाबत वरीष्ठ शाखेला कळविणे.
२. सी. आर. संदर्भ (सेंट्रल रेफरन्स) म्हणजेच केंद्राने/राज्याने सुचित केलेल्या पत्र/प्रकरण/तक्रार इत्यादीबाबत १५ दिवसाच्या आत केंद्र/राज्य शाखेला उत्तर/माहिती पाठवावी
३. लेटरहेड - संस्थेच्या विहित नमुन्या प्रमाणे (परिशिष्ट २ )
४. शिवीर/कार्यक्रम मागणी अध्यक्ष, सरचिटणीस आणि संबंधित विभागाचा उपाध्यक्ष यांच्या स्वाक्षरीने त्यांच्या वरीष्ठ शाखेला मागणी करणे व त्याची प्रत केंद्रीय प्रशिक्षण विभाग, केंद्रीय कार्यालय प्रमुख यांना पाठवावी.
डी) शाखा पदाधिका-यांचे शिक्के (परिशिष्ट ४) नाव कंसात टाकणे, नाव, पद व संस्थेचे नाव एकाच साईजचे असणे आवश्यक आहे.
इ) कार्याची माहिती -
१. सरक्युलेशन फाईल - शाखेतील विविध कार्याची हँडबिल, पोस्टर, कार्यक्रम पत्रिका इत्यादीची बॉक्स फाईल सर्वांनी पाहण्यासाठी कार्यालयात ठेवणे
२. एस. ओ. फाईल (स्टँडींग ऑर्डर फाईल)- कामकाज, स्टेशनरी, धम्मदान, साहित्य, नियुक्त्या इत्यादी बाबतचे संस्थेची परीपत्रके, आदेश इत्यादी एकत्र ठेवावे व हि फाईल कधीही नष्ट करु नये, ती नेहमी कार्यालयातील मुख्य टेबलावर असावी.
जी) प्रत्येक जमा रक्कमेची पावती देणे जमा रक्कमेच्या पावतीसाठी भरणा पावती प्रत्येक शाखेने छापने आवश्यक आहे. शिबीर /कार्यक्रमामध्ये जनतेकडून सार्वजनिक पध्दतीने दान प्राप्त झाल्यास रु ५०/-पेक्षा जास्त रक्कमेची पावती देणे आवश्यक आहे.
तसेच दान स्वरुपात मिळालेल्या वस्तूची सुध्दा पावती दिली पाहीजे व त्याचे स्वतंत्र रजिस्टर ठेवावे व त्यामध्ये अथवा पावतीवर त्या वस्तूचा वापर कुठे केला आहे त्याचे एक विवरण किमान दोन पदाधिकारी यांनी प्रमाणित केले पाहिजे. विशिष्ट कार्यासाठी जमा केलेली रक्कमेसाठी स्वतंत्र धम्मदान पावती द्यावी. उदा. बुध्दविहार, महाविहार, भवन, कार्यालय बांधणे इत्यादी
एच) भरणा पावती व धम्मदान पावती छापण्यासाठीची मंजुरी केंद्र देते व त्यांनी दिलेले ऑर्डर नंबर त्या पावतीवर छापने आवश्यक आहे. ज्यांनी विनापरवाना छपाई केली तर त्यांची मध्यवर्ती शाखा/ प्रभारीला जबाबदार धरले जाते.
आय) शाखा बँक खाते - राष्ट्रीयकृत /स्थानिक/शेडयुल्ड बँकेत/जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत काढावे.. अध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष यापैकी दोघांच्या स्वाक्षरीने पैसे काढले जाईल. शाखेला जमा झालेली सर्व रक्कम बँकेत जमा करावी व हातात केवळ रु ५००/- शिल्लक ठेवावी.
जे) कॅशबुक/पेटीकॅशबुक ठेवणे .जमा-खर्चाची प्रत्येक दिवसाची नोंद कॅशबुक (रोज किर्द) ठेवली जाते . व प्रत्येक महिन्याला हातातील व बँकेतील शिल्लक नमूद केल्यानंतर अध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष यांची स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. पेटीकॅशबुकमध्ये प्रत्येक शिबीर/कार्यक्रम नुसार जमा-खर्च लिहावा. त्याचा एकुण जमा व खर्च कॅशबुक मध्ये नमूद करावा. अनामत रक्कमे साठी जमा पावती देणे आवश्यक आहे.
के) व्हाउचर (खर्चाचे बिल) परिशिष्ट ५ च्या नमुन्यात प्रत्येक शाखेने छापून घेणे आवश्यक आहे. हे व्हाउचर प्रत्येक बिलावर लाऊन अध्यक्ष / सरचिटणीस / कोषाध्यक्ष व ज्यांनी बिल संबंधितास दिले आहे त्याची/किंवा ज्याने रक्कम स्विकारली आहे त्यांची सही घ्यावी.
प्रत्येक खर्चाचे बिल संस्थेच्या संबंधित शाखेच्या नावावरील आवश्यक (वैयक्तीक पदाधिका-याच्या नावे असू नये)
एल) जमाखर्च अहवाल नमुना (परिशिष्ट ६) च्या नमुन्या प्रमाणे आवश्यक आहे.
जमाखर्च अहवाल आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये गाव/नगर/वार्ड शाखेने ३१ मे रोजी, - शहर / तालुका शाखेने ७ जून रोजी, जिल्हा शाखेने २१ जून रोजी आणि राज्य / प्रदेश शाखेने ३० जून रोजी मंजुर केल्यानंतरच आपल्या वरीष्ठ शाखेस सादर करावा.
एम) शाखेने ठेवावयाचे दप्तर कॅशबुक (रोजकिर्द), पेटीकॅशबुक, लेजरबुक (खतावणी), मिनिटबुक (प्रोसीडिंग बुक, इतिवृत्त नोंदवही) - कार्यकारीणी बैठकीसाठी व वार्षिक सर्वसाधारण सभा (जनरल बॉडी) सभेसाठी दोन वेगवेगळे आवश्यक, संस्थेकडून आणलेल्या स्टेशनरीचे स्टॉक रजिस्टर, डेडस्टॉक (मालमत्ता) रजिस्टर इत्यादी.
मुख्य शाखा २५ फाईल/रजिस्टर, संस्कार विभाग ४ रजिस्टर, महिला विभाग ३ रजिस्टर, प्रचार पर्यटन विभाग ६ रजिस्टर / फाईल, संरक्षण विभाग (समता सैनिक दल) ४ रजिस्टर / फाईल.
कलम IX - इतर महत्वपूर्ण सुचना व नियम
अ) शाखा कार्यालय प्रत्येक शाखेचे स्वतंत्र कार्यालय घेणे आवश्यक आहे, कार्यकारीणीने कार्यालय • कोठे असेल असे ठरविले नाही तर, सरचिटणीस यांचे घर हेच कार्यालय मानले जाईल.
बी) संस्थेने निश्चित केल्याप्रमाणे धम्मदान देणे/घेणे आवश्यक आहे. (आदेश क्र. ४३/२०२३दि. १९/६/२०२३)
जी) पदाधिकारी यांची माहिती प्रत्येक वर्षी १५ जूलै पर्यंत देणे आवश्यक आहे.
एच) आरोप / तक्रार कोणतीही तक्रार लेखी स्वरुपात दोन प्रतीमध्ये असावी, तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याची एक प्रत तक्रार ज्याच्या विरुध्द आहे त्याला द्यावी. आवश्यक वाटल्यास केंद्र/प्रतिनिधी व्दारे • समोरासमोर चर्चा करुन निर्णय घेऊ शकते.
टिप - सोबत जमा-खर्च अहवालाचा नमुना (परिशिष्ट ६) व खर्चाचे व्हाउचरचा नमुना (परिशिष्ट ५)
मनोगतामध्ये गौतम वाघमारे प्रचार पर्यटन प्रमुख. नवनीत साळवी सरचिटणीस. प्रदीप मोहिते कोषाध्यक्ष. संतोष जाधव सचिव संस्कार विभाग . संदीप साळवी सचिव संरक्षण. संतोष साळवी कार्यालयीन सचिव हिशेब तपासणी चंद्रकांत गायकवाड. दिलीप चाफे संघटक. इत्यादी प्रशिक्षणार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले.
शेवटी रायगड जिल्हा शाखेचे अध्यक्ष संतोष जाधव यांनी अध्यक्षीय भाषण केले तद् नंतर उत्तरार्ध परीक्षा घेण्यात आली सरणतय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
No comments:
Post a Comment